Monday, March 5, 2018

आदत से मजबूर ;)

काहीही करायचं नाही, फक्त आराम करायचा दोन दिवस! अगदी निक्षून सांगितलं होतं स्वतःलाच. जेवढ करायला पर्यायच नसेल, तेवढेच हातपाय हलवायचे फक्त. बाकी फक्त आराम. आपण विश्रांती घ्यायला आलोय इथे. घरून निघालो तेंव्हापासून घोकत होते मनामध्ये. महाबळेश्वरला पोहोचल्यावर सुद्धा निश्चय कायम होता. पण संध्याकाळी वेण्णा लेकला निघालो, आणि घात झाला. गर्दीच्या दिवसात हमखास ट्रॅफिक जाम असणार्‍या लेकच्या रस्त्याला चक्क अंजनाची झाडं फुललेली दिसली. किती वर्षांनी भेटला अंजन! यापूर्वी बघितला होता, तेंव्हा नाव-गाव माहित नव्हतं. अचानक समोर फुललेलं झाड दिसलं, आणि इतका सुंदर फुलोरा बघून त्याचा फोटो काढला गेला. आणि नंतर केंव्हा तरी समजलं, की या सुंदर फुलांच्या झाडाचं नाव अंजन आहे. आपल्या अंजन-कांचन-करवंदीच्या काटेरी देशातला अंजन. (पण अंजन – कांचन काटेरी कुठे असतात?)
तर गाडीतून जाताना रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला भरपूर अंजन फुललेला दिसला. गाडीतून उतरल्यावर लक्षात आलं, ही फुलं नाहीत, कळ्या आहेत. गुलाबीसर रंगाच्या.

माऊबरोबर तिथल्या चक्रात बसले, आणि वरून चक्क अंजनाची फुलं फुललेली दिसली! आता अंधार झाला होता, त्यामुळे उद्या परत फुलं शोधणं आलं. आपण आराम करायला आलोय, सकाळी उठून फिरायला गेलंच पाहिजे महाबळेश्वर मध्ये असा काही नियम नाहीये. शिवाय थंडी आहे, आपण गरम कपडे काहीच आणलेले नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी चालली होती. बराच वेळ चुळबूल करत खोलीतच बसले. मग म्हटलं, मस्त ऊन आहे ... जरा अंजनाची फुलं दिसताहेत का कुठे तेवढं तरी बघून येऊ, विल्सन पॉईंटपर्यंत काही नको जायला. हॉटेलच्या आवारात एवढी जुनी झाडं आहेत, एखादा तरी अंजन असेलच की! मग हॉटेलच्या आवारात एक आतून चक्कर मारली, बाहेरूनही एक फेरी मारून झाली. अंजन काही सापडला नाही. विल्सन पॉईंटच्या रस्त्याला नक्की असणार. (या पॉईंटला जायला – यायला एक गोलाकार रस्ता आहे. तर माझ्या नेहेमीच्या वाटेने गेलं तर  पॉईंटच्या बर्‍याच अलिकडे अंजन भेटायला हवेत.) तिथेवर जाऊन यावं फक्त, म्हणून बाहेर पडले. तसंही मी रोजचे ओळखीचे रस्ते सुद्धा सहज चुकू शकते. आज तर रस्त्याकडे लक्ष नव्हतंच – झाडांकडे बघतच निघाले होते. जरा वेळ चालल्यावर चक्क रस्त्याकडे लक्ष गेलं. लक्षात आलं, आपला विल्सन पॉईंटचा फाटा केंव्हाच गेलाय. आपण सातार्‍याच्या रस्त्याला आहोत, असेच चालत राहिलो तर बहुतेक सातार्‍याला जाऊन पोहोचणार आपण. विल्सन पॉईंटवरून परत येण्याचा रस्ता आलाय आता. मग त्या रस्त्याला वळले. पॉईंटला पोहोचेपर्यंत एकही अंजन नाही! आता मागे वळून किंवा पुढे जाऊन वेळ तितकाच लागणार होता. मग सरळ माझ्या नेहेमी वर येण्याच्या रस्त्यानेच यावं. त्या रस्त्याला अर्थातच पोटभर अंजन भेटले – भरपूर फुलं बघितली, आणि मन तृप्त झालं एकदम.


आता मी खरंच फिरायला बाहेर पडले नव्हते आज. अंजन बघायला जरा चालावं लागलं तरी चालायचंच, नाही का? ;) (येतांना बघितलं, हॉटेलच्या आवारात अगदी कोपर्‍यामध्ये एक फुललेला अंजन मला चिडवत उभा होता!)

दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडायचं आता काहीच कारण नव्हतं. अंजन पण बघून झाले, फिरायला जायचंच नाहीये, मग बाहेर कशाला पडायचं? अगदी ठरवून खोलीतच बसून होते सकाळी. बर्‍याच वेळाने माऊचा बाबा उठला.
“हे काय, तू फिरायला नाही गेलीस अजून?”
“नाही!”
“अग, अजून काही फार उशीर नाही झाला, जाऊन ये!”
आता एवढा आग्रह झाल्यावर बाहेर पडायलाच लागलं नाईलाजाने. आज नीट सरळ नेहेमीच्या रस्त्याने निघाले विल्सन पॉईंटला. कालचे सगळे अंजन परत भेटले. आणि पॉईंटवर इतका सुंदर फुललेला अंजन भेटला!!! आज बाहेर पडल्याचं सार्थक झालं म्हणायचं! ;)