Sunday, January 28, 2018

टिल्लू ट्रेक – केंजळगड

परवा माऊ आणि मी त्यांच्या “वायामाच्या” ग्रूपसोबत केंजळगडला जाऊन आलो. केंजळगड नेहेमी वाई फाट्यावरून महाबळेश्वरकडे जाताना बघितला होता, पण आम्ही गेलो ते भोरवरून. डोंगराच्या मध्याच्या जवळपास एक वस्ती आणि देऊळ आहे, तिथपर्यंत आता गाडी जाते. वस्तीतल्या शाळेच्या ओट्यावर नाश्ता केला. दहा – वीस घरं असतील इथे जेमतेम. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा. पण ती एवढीशी शाळा बाहेरून बघून एकदम आवडलीच. ज्यांनी कुणी बांधली आहे, त्यांनी मुलं खरंच शिकावीत म्हणून बांधलीय असं वाटलं. बाहेर मुलं डबा / मध्यान्ह भोजनासाठी बसणार तिथे प्रत्येक ताटासाठी वर्तुळ रंगवलेलं. पायर्‍यांवर चढता क्रम, उतरता क्रम असं लिहिलेलं. दारांवर स्वागताला बाल हनुमान आणि श्रीकृष्ण.आणि पायर्‍या चढू न शकणारे कुणी असतील तर त्यांच्यासाठी रॅम्पसुद्धा आहे या छोटुश्या शाळेला! (माऊच्या पुण्यातल्या शाळेला तरी आहे का रॅम्प? बघायला हवं!) शाळा भरलेली असतांना बघायला खूप आवडलं असतं.





निम्मा डोंगर बसने गेल्यामुळे चढायला थोडंसंच होतं. पण वाट एकदम मस्त रानातनं जाणारी, सगळ्या बाजूंना बघायला एकदम सुंदर, आणि ताजी ताजी सकाळची हवा त्यामुळे मज्जा आली. गड तसा छोटासा आहे. दोन चुन्याच्या घाण्या, एक पाण्याचं टाकं, बिना छपरा- खांबांचं देऊळ, एक गुहा. दहा पंधरा मिनिटात गडाला चक्कर मारून झाली सुद्धा.


खालची पाकेरेवस्ती, मागे रायरेश्वर
वरून रायरेश्वर, रोहिडेश्वर, कमळगड दिसतात, पाचगणीचं पठार थोडंफार दिसतं, धोमचं पाणी दिसतं. 

केंजळगड

धोमचं पाणी, मागे कमळगड. अगदी मागे पाचगणीचं पठार

क्षितिजावर अगदी धूसर रोहिडेश्वर

घाणा फिरवायचा प्रयत्न चाललाय :)

गडावरचं देऊळ?!

वाटेत काही पळस पूर्ण फुललेले, काही अजून झोपलेलेच दिसले. ही तीन अनोळखी फुलं भेटली:




खाली वस्तीमध्ये एका मोकळ्या जागेत खूप छोटी वासरं चरत होती. माऊ अर्थातच वासरांना भेटायला गेली, आणि वासरं पांगली. एकाही वासराला हात लावायला मिळाला नाही. पण (त्यांची आठवण म्हणून? ;) ) वासराचं शेण मात्र मिळालं. (तसं वाटेत आम्हाला पोपटाची पिसं सुद्धा मिळाली होती. ती बघितली, सगळ्यांना दाखवली, आणि कुणाला हवी त्यांना घरी न्यायला देऊन पण टाकली. पण वासराचं शेण मात्र सॅकमध्ये घालून थेट पुण्याला!!! :D)

येतांना वाटेत आंबवडे गावातला झुलता पूल, नागेश्वर मंदिर आणि कान्होजी जेधे, जिवा महाले यांच्या समाधी जमलं तर बघायच्या होत्या. नागेश्वर मंदिर सुंदर आहे. मस्त हेमाडपंती बांधकाम आहे. वाटेमध्ये गर्द झाडी, शेजारी पाणी. भर दुपारी सुद्धा आत एकदम थंडगार, शांत. पण इतक्या सुंदर मंदिराला भडक ऑईलपेंट फासलाय. :( वेळ कमी होता म्हणून दोन्ही समाध्या बघता आल्या नाहीत.

नागेश्वर मंदिर

मंदिराजवळ मिळालेलं मधाचं पोळं
थोडंसं चालून डोळ्यांना भरपूर मेजवानी असा हा मस्त टिल्लू ट्रेक झाला एकूणात.

Thursday, January 11, 2018

काळं पाणी, निळं पाणी...३

“आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनार्‍यांपैकी पहिल्या दहात” असणारा राधानगरचा समुद्रकिनारा बघायचा होता. त्यासाठी हॅवलॉक बेटावर जायचं होतं. इथलं जंगल रिझॉर्ट, रिझॉर्टच्या परिसरातली झाडं, तिथून चालत दोन मिनिटांवर असणारा समुद्र हे सगळंच अप्रतिम.





झाडांच्या उंचीचा अंदाज यायला खाली ताईला उभं केलंय :)

  


वरून दुसरं झाडच वाटतंय ना? म्हणून झाडांचे फोटो बंद. :)

  






तिथून वॉटर स्पोर्ट्ससाठी एलिफंट बीचला गेलो होतो. इथे स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग इ. ची सोय आहे. स्नॉर्केलिंगमध्ये अप्रतिम प्रवाळ आणि मासे बघायला मिळाले. पण बोटीवाल्यांची दादागिरी, तुम्ही आवाज चढवल्याशिवाय तुमचा स्नॉर्केलिंगसाठी नंबर न लागणं हे प्रकार होतेच. तरीही, सगळ्यांनी एकत्र स्नॉर्केलिंग केल्यावर जे अनुभवायला मिळालं त्यामुळे असं वाटलं, की आलो हे बरं झालं. हॅवलॉकला असेपर्यंत माऊने दिवसभर पाण्यात डुंबून घेतलं.  :)










इथून पोर्ट ब्लेअरसाठी परत निघालो तेंव्हा आमचा ड्रायव्हर खूप अस्वस्थ होता – आज सकाळी त्याचा एक गाववाला  फेरीच्या धक्क्यावर पाण्यात बुडून मेला होता! कार्गो बोटीवर काम करणारा हा गाववाला आज खूप पिऊन कामावर आला. बोट धक्क्यात लागलेली. त्याने नांगर उचलून घेतला, आणि कसा कोण जाणे तोल जाऊन तो पाण्यात पडला. इथल्या उकाड्यापासून आराम म्हणून कित्येक बोटवाले पाण्यात डुबकी मारतात. त्यामुळे धक्क्यावर भरपूर गर्दी असून सुद्धा कुणी फारसं लक्ष दिलं नाही. लोकांच्या लक्षात येईपर्यंत नाकातोंडात पाणी जाऊन याचा जीव गेला! आमचा ड्रायव्हर रोज गाडी घेऊन बोटीतून पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉकला येणारा. त्याने हे पाण्याशी संबंधित काम सोडून द्यावं म्हणून त्याची आई आज मागे लागली होती. पण मग खायचं काय?

***

अंदमान – निकोबार द्वीपसमुहात ६०० ते ७०० बेटं आहेत, त्यातली ६०- ७० माणसांची वस्ती असणारी. त्यातली जेमतेम ८ – १० पर्यटकांसाठी खुली आहेत. बाकी बेटांपैकी काही आदिवासीसाठी राखीव, काही संरक्षणदलाच्या ताब्यात. (इथून हाकेच्या अंतरावर असणारं कोको आयलंड काही वर्षांपूर्वी ब्रह्मदेशाने चीनला “भेट” दिलंय. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने या बेटांचं महत्त्व अजूनच वाढलंय.) आदिवासींच्या ६ जमाती इथे सापडतात. आम्हाला दिसले ते जरावा, अजूनही बाहेरच्यांबाबत अतिशय आक्रमक असणारे सेंटिनेलीज, शिक्षण घेऊन सरकारी नोकर्‍यांपर्यंत पोहोचलेले निकोबारीज, ग्रेट अंदमानीज आणि ओंगे. (“जन्मठेप” मध्ये निकोबारमधल्या एका विशिष्ट जमातीविषयी वाचलं होतं – या जमातीच्या लोकांचं शेपटीचं हाड मोठं असल्यामुळे त्यांना खुर्चीवर बसता येत नाही, चेहेरा बराचसा माकडासारखा दिसतो, माकड आनि प्रगत मानव यांच्या मधल्या टप्प्यावरचे ते वाटतात असं काहीसं. यांचा कुठे उल्लेख सापडला नाही.) निकोबारी सोडता बाकी सगळ्या जमातींच्या लोकसंख्या शेकड्यामध्ये. इथे ट्रायबल टुरिझमवर सक्त बंदी आहे. देशावरून काही पिढ्यांपूर्वी इथे येऊन वसलेले बंगाली (दोन तृतियांश) आणि तमीळ (एक तृतियांश), बदली होईपर्यंत येणारे सरकारी अधिकारी आणि लष्कराचे लोक, पर्यटक आणि या सगळ्यांच्या कक्षेबाहेर जगणारे आदिवासी अशी इथली सगळी लोकसंख्या. ही सगळी वेगवेगळी, एकमेकांना क्वचितच छेदणारी विश्वं वाटली मला. आदिवासींसाठी हे विश्व प्रलयकाळाच्या जवळ पोहोचलेलं असावं – पन्नास-शंभर लोकसंख्येचे हे समुह कुठल्याही साथीमध्ये सुद्धा होत्याचे नव्हते होऊन जातील. अजून किती वर्षं टिकाव धरणार ते? पर्यटकांना फिरायला आलेल्या जागेविषयी सेल्फी पॉईंटपलिकडे देणंघेणं नसावं. सरकारी अधिकारी आणि लष्कराच्या लोकांसाठी हे बर्‍यापैकी पनिशमेंट पोस्टिंग असणार, कारण कित्येक भागांमध्ये कुटुंब घेऊन जाता येत नाही. मत्स्यव्यवसाय वगळता बाकी म्हणण्यासारखे उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांचा उदरनिर्वाह बराचसा पर्यटकांवर अवलंबून. पर्यटन व्यवसाय अजून फारसा विकसित नाही. मुख्य भूमीपासून हजार किमी अंतरावरचा हा एक ठिपका. इथल्या तरूणांची स्वप्नं काय असतील? ती चेन्नई किंवा कलकत्ता न गाठता पूर्ण होत असतील का? रस्त्यात जागोजागी "आपलं गाव अंमली पदार्थमुक्त करू या" अशा पाट्या दिसतात, ज्या बघून इथे अंमली पदार्थांचा मोठा विळखा आहे का अशी शंका येते. पण आमच्या गप्पिष्ट ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हेगारी मात्र फरशी नाही. सगळी अर्थव्यवस्था देशातून येणार्‍या  मालावर अवलंबून – पेट्रोल -डिझेल, गाड्या, कापडचोपड, अन्नधान्य, फळं - म्हणजे आठवडाभर बाजारात बटाटे मिळालेले नाहीत, आज कार्गो आला तर पराठ्यात बटाटे असतील, नाहीतर प्लेन पराठा असं हॉटेलमध्ये सहज ऐकायला मिळतं.

काय भवितव्य असायला हवं या जागेचं, इथल्या लोकांचं? दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी इथे भारतातले बंदी पाठवले, म्हणून ही बेटं आज भारताचा भाग आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व मोठं आहे. भारतीय वंशाच्या लोकांची आज तिथे वस्ती आहे, पण मुख्य भूमीपासून तुटलेपण अर्थातच आहे. आपल्या देशाच्या राजकारणात / समाजकारणात/अर्थकारणात काही स्थान मिळवण्यासाठी ही फारच छोटी लोकसंख्या आहे. इथले आदिवासी तर त्याहूनही कमी, कुणाच्या खिजगणतीत नसल्यातच जमा.  स्थानिक संस्कृती / अस्मिता / वैशिष्ट्यं असलं काही कुठे दिसलं नाही इथे. इथल्या दुकानात मिळणारी सुवनीअर्स सुद्धा मुख्य भूमीवरूनच आयात केलेली! Overall, they seem to be too small to matter. 

Wednesday, January 10, 2018

काळं पाणी, निळं पाणी...२

पोर्ट ब्लेअरहून रॉस आणि व्हायपर बेटांची एका दिवसाची फेरी आम्ही घेतली. रॉस हे चिमुकलं बेट. इंग्रजांच्या काळात पोर्ट ब्लेअरमधले सगळे इंग्रज अधिकारी इथे राहत. काळ्यापाण्याच्या त्या वसाहतीमधला हा स्वर्ग होता – स्वतःला “अंदमानचा परमेश्वर” समजणारा जेलर बारीबाबा सुद्धा इथेच रहायचा. सुंदर बंगले, टेनिस कोर्ट, चर्चेस, क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव असं हे चिमुकलं पण टुमदार “पूर्वेकडचं पॅरीस” होतं. दुसर्‍या महायुद्धाच्या सुमाराला रॉस बेटावरची वस्ती उठवण्यात आली. त्यानंतर भूकंपाने या बेटाची मध्यातून दोन शकलं केली. आज या बेटावर फक्त भग्न अवशेष बघायला मिळतात. सेल्युलर जेलचे सातापैकी तीन पाख तरी अजून शाबूत आहेत, साहेबांच्या बंगल्यांचे अवशेषही मातीला मिळालेत. इथल्या भिंतीभिंतीतून उगवलेले वड-पिंपळ बघतांना परत परत “विश्वात आजवरी शाश्वत काय झाले!” या सावरकरांच्या ओळी आठवल्यावाचून राहिल्या नाहीत.






व्हायपर बेटावर कुप्रसिद्ध “चेन गॅंग जेल” आणि अंदमानातला पहिला तुरुंग होता. इथे महिलांचाही तुरुंग होता असा उल्लेख सापडला, पण जास्त माहिती मिळाली नाही. कुठल्या स्त्रियांना इथे काळ्यापाण्यावर पाठवलं गेलं? काय झालं असेल त्यांचं पुढे? तसंही स्त्रियांना एकदा तुरुंगात गेल्यावर घर संपतंच. मग काळं पाणी काय आणि देशातले तुरुंग काय – काही फरक होता का त्यांच्यासाठी?



दुसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरहून एक दिवसाच्या सहलीसाठी बाराटांगच्या चुनखडीच्या गुहा बघायला गेलो होतो. हा एक अगदी वेगळा अनुभव होता. सकाळी(?) तीन वाजता पोर्ट ब्लेअरहून निघालो. सव्वातीनच्या सुमाराला गावातून बाहेर पडता पडता रस्त्यात एक पळणारा दिसला, आणि एकदम मस्तच वाटलं! वाटेत “कॅटलगंज” च्या आसपास अंदमानात पोहोचल्यापासून पहिल्यांदाच शेणाचा वास आला, भरपूर गाईगुरं दिसली. इथे एकूणातच दुधाचा तुटवडा दिसला. सगळीकडे पावडरचं दूध. इथेली गुरं सुद्धा मांसासाठी पाळलेली, दुधासाठी नाही. या बेटांवर आता थोडीफार भातशेती  होते, नारळाच्या, सुपारीच्या, केळीच्या बागा आहेत, ऊस आहे. बेटाबाहेर गेलं नाही, तरी इथल्या स्थानिक लोकांची गरज भागण्याइतपत उत्पन्न निघतं. कोंबड्या – बकर्‍या पण थोड्या दिसतात. मग दूध दुभतं का बरं नसावं?

साडे पाचच्या सुमाराला जिरकाटांगला पोहोचलो. पोर्ट ब्लेअर सोडल्यापासूनच सुंदर जंगल सुरू झालं होतं – जिरकाटांगपासून पुढे जरावा आदिवासींचा भाग आहे, इथे पोलीस बंदोबस्तातच गाड्या जायला परवानगी असते. गाड्यांचा पहिला ताफा सकाळी सहा वाजता निघतो. तो गाठण्यासाठी म्हणून पोर्ट ब्लेअरहून इतक्या पहाटे निघायचं. आदिवासी भागातून जातांना कुणीही गाडीतून उतरायचं नाही, आदिवासी दिसले तर फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचा / काही देण्या-घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. “माझी जन्मठेप”मध्ये हे आदिवासी त्या काळात नग्नावस्थेत रहायचे, बाहेरच्या माणसांना पाहिल्याबरोबर त्यांच्यावर हल्ला करायचे आणि मारून टाकलेल्या बाहेरच्या माणसाला खाऊनही टाकत असे उल्लेख सापडतात. आम्हाला या भागातून जातांना कॅमेरा बाहेर काढूच नका अशा सक्त सूचना होत्या. योगायोगाने परतीच्या वाटेवर काही जरावा दिसलेही. मूळ आफ्रिकन वंशाच्या या जमातीचे जेमतेम पाचशेएक लोक अजून शिल्लक आहेत. आता ते थोडेफार कपडे वापरतात. हातात तिरकमठा आणि अंगात जीन्सची पॅंट अशी काही १५ – १६ वर्षाची वाटाणारी मुलं दिसली, मग लहान मुलांना कडेवर घेऊन जाणार्‍या काही जरावा बायकाही दिसल्या.

पोलीस पहार्‍यात जिरकाटांगहून मिडल डिस्ट्रिक्टला पोहोचल्यावर तिथून पुढचा प्रवास बोटीने. बाराटांगमधल्या शेवटच्या टप्प्याला परत दुसरी लहान बोट आपल्याला खारफुटी जंगलातून घेऊन जाते, आणि मग शेवटचा साधारण दीड – दोन किमी अंतराचा चुनखडी गुहेपर्यंतचा प्रवास चालत. या गुहेमध्ये स्टॅलक्टाईट आणि स्टॅलग्माईट दोन्ही प्रकारच्या रचना तयार झालेल्या आहेत.  ते बघून मग “मड व्होल्कॅनो” बघायला गेलो. दिवसभरात एवढं वेगवेगळं काही पाहिल्यानंतर हा मड व्हॉल्कॅनो म्हणजे एकदम फुसका बार निघाला. तिथे कुंपण करून पाटी लिहिलेली नसती तर पाईपमधून गळालेल्या पाण्याने जरा चिखल झालाय असं वाटून तिकडे बघितलंही नसतं कुणी!  मड व्होल्कॅनोला नेणारी गाडी एकदम अठराशेसत्तावनच्या बंदींबरोबरच अंदमानात पोहोचलेली असावी इतकी जीर्ण वाटत होती. इतक्या ठिकाणून वाजणार्‍या आणि हलणार्‍या गाडीत बसायचा माऊचा हा पहिलाच अनुभव, तिने तो मनापासून एन्जॉय केला! :)
नजर जाईल तिथवर निळं पाणी, हिरवी जंगलं!

खारफुटीमधून जाताना



stalectites


चुनखडी गुहेकडे जाण्याचा रस्ता

खारफुटीमधून जाण्याचा रस्ता


मड व्होल्कॅनो! :)

***
दिवसभर प्रवास करूनही फक्त बोटीतून जातांना आम्हाला ऊन लागलं. संपूर्ण प्रवासात आजुबाजूला इतकी सुंदर झाडं होती, आणि बर्‍याच बुंध्यांवर झाडाची नावंही लिहिलेली. पण मी झाडांचे फोटो काढायचा प्रयत्न सोडून दिला, कारण अंदमानातली झाडं म्हणजे एल ग्रेकोच्या चित्रातल्या माणसांसारखी प्रमाणाबाहेर उंच आहेत.  त्यामुळे एक तर आपल्या ओळखीची झाडं पण अनोळखी वाटायला लागतात (वाटेत दोन – तीन मजले उंच केवड्याचं बन दिसलं!), आणि त्याहून मोठी अडचण म्हणजे बुंध्यावर झाडाचं नाव असलं, तरी त्याची पानं-फुलं-फळं पार वर उंचावर, आजूबाजूच्या गर्दीत मिसळून गेलेली असतात. म्हणजे कुणाचं नाव काय, कुठली पान कशाची काहीच समजत नाही. इथल्या जंगलांमध्ये अंडरग्रोथ म्हणून पसरलेली अजस्र फोलिडेड्रॉन्स आणि पामच्या वेगवेगळ्या जाती बघितल्यावर शहरी बागांमध्ये सावलीतली झाडं म्हणून लावलेली ही झाडं म्हणजे दहा-वीस फुटी पिंजर्‍यातले दात- नखं गळालेले बिचारे वाघ वाटायला लागले.