Monday, January 30, 2017

सोन्याची फुलं

    कधीकधी तुम्हाला कुणाची तरी मनापासून आठवण येते आणि तेंव्हाच त्यांनाही तुमची आठवण येते. टेलिपथी म्हणा. अशा वेळी तुमची भेट झाली तर त्यासारखं सुख नाही. शनिवारी असंच झालं. टेकडीवरच्या सोनसावरीची आठवण झाली अचानक. तिला भेटावंसं वाटलं, पण तिच्या घराचा नेमका पत्ताच आठवेना! पत्ता विसरण्यात मी हुशार आहेच. त्यामुळे वेळ वाया न घालवता सरळ आईला फोन केला. तिने सांगितलेल्या पत्त्यावर गेले, तर तिथे अशी सोन्याच्या फुलांची उधळण चालली होती!!!

सोनसावर किंवा पिवळी सावर. (पिवळी सावर नाव आवडत नाही मला अजिबात. ही फुलं सोन्याचीच. त्यांचा रंग खरंच सोन्यासारखा वाटतो उन्हात.) फारसं उंच नसणारं – बरेचदा झुडूप म्हणावं असंच – झाड. फांद्यांची रचनाही काही काटेसावरीसारखी (लाल शेवरी) नेटकी नाही. फुलं तशी मोजकीच – एकदम सगळं झाड भरलेलं मी तरी बघितलं नाही अजून. काटेसावरीसारखी या झाडावर किडे – माशा – पक्षी अशा सगळ्यांची झुंबड उडालेली दिसत नाही मधासाठी. पण सोनसावरीच्या एकेका फुलाने मला वेडं केलंय. फुलाचा रंग म्हणजे सोन्याचा धमक पिवळा! उतरत्या उन्हात न्हायलेली अशी फुलं बघणं म्हणजे मेजवानी. आजुबाजूची सगळी झाडं पानं टाकून बोडकी. पायथ्याचं गवतही सुकलेलं. काळी माती, सुकलेलं गवत, आणि त्यावर उठून दिसणारी ही झाडाखाली पडलेली सोन्याची फुलं! अजून थोडी झाडाच्या शेंड्यावर, कुठे एखादं शेजारच्या झुडुपाच्या काट्यात अडकलेलं. पहिलं झाड दिसलं, मग दुसरं, मग मला सगळीकडे सोनसावरीची झाडंच दिसायला लागली!






    इतक्या वर्षांपासून ही टेकडी तशी ओळखीची आहे. सोनसावरीचं एखादं झाड, त्यावर फुललेलं एखादंच फुल बघितलं होतं आतापर्यंत. पण इथेच दुसर्या बाजूला एवढी सोनसावरीची झाडं आहेत, त्या झाडांखाली असा फुलांचा सडा पडतो हे नवल बघायला परवाचा शनिवारच यावा लागला. माऊने आणि मी वेड्यासारखी फुलं वेचली. माऊने तर वाटेत भेटलेल्या कुणाकुणाला ती वाटलीही. मग घरी आईला आणून दाखवली फुलं.

    रविवारी सकाळी माझ्या नेहेमीच्या टेकडीवर गेले, तिथलीही सोनसावर फुललेली! आणि आजवर मी तिथे सोनसावरीची दोन – तीन झाडं पाहिली होती, आज मला तिथे सहा तरी झाडं भेटली. इतकी वर्षं कुठे लपून बसली होती ही झाडं काय माहित! रविवारी संध्याकाळी मग परत आई-बाबांना ही झाडं बघायला घेऊन गेले. आज परत अजून नवी झाडं सापडली!!! काही लोकांना स्वप्नात धन दिसतं, ते “मी इथे इथे आहे, मला बाहेर काढा” म्हणतं म्हणे. शनिवारी सोनसावरीने आठवण काढ्ली, आणि तिचा माग काढल्यावर टेकडीवर मला सोन्याची खाण लागली आहे.

2 comments:

rahul said...

कुठे आहे ही सोन्याची फुले

Gouri said...

वेताळ टेकडी आणि म्हातोबाच्या टेकडीवर बघितली आहेत ही झाडं.