Tuesday, April 28, 2015

आईची शाळा



माऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही. 
 कारण तिची आई नोकरी करते. 
आई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांचा अभ्यास कोण करून घेणार? आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच!
नोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार?
नोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच! 
तिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच!
 करियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी ... पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने!) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा!

याच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी!

सद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता,  आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय! “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया!” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही! :)  

8 comments:

Anagha said...

काय बोलणार ?! कठीण आहे सगळं !

अपर्णा said...

इंटरेस्टिंग पोस्ट. यातल्या प्रत्येक अनुभवातून स्वतः गेलेय मी त्यामुळे रिलेट पण करतेय फक्त मी जिथे आहे तिथे पालकाना (आणि खर मुलांना पण) शाळेसाठी qualify केलं जात नाही. हाही मुद्दा असू शकतो हेच माझ्यासाठी नवीन आणि थोडं गैरलागू आहे. बरं इतकं करून मुलांना चांगलं शिक्षण देण्याची हमी देताहेत (आणि करताहेत) का?
तुला आणि माऊला शुभेच्छा :)

Gouri said...

अनघा, शाळेचं आणि माझं फार काळ जमणं खरंच कठीण वाटतंय!

Gouri said...

अपर्णा, अग इथे पण मुलांचे इंटरव्ह्यू घ्यायला बंदी आहे. पालकांशी बोलतात. आणि कोणत्या निकषावर निवडलं / नाकारलं ते सांगत नाहीतच ऑफिशिअली. पण हा प्रश्न शाळेने त्यांच्याशी बोलतांना परत परत विचारलाय, आणि त्यांच्या उत्तराने शाळेचं समाधान झालं नव्हतं. यावरून तुम्ही काय ते ठरवायचं. शाळेचा दर्जा चांगला समजला जातो, नावाजलेली शाळा. अजून एका शाळेविषयी अगदी हेच ऐकलंय.

सौरभ said...

तिकडच्या शिक्षिकांची मुलं जातात की नाही शाळेत? :P की त्यांना वेगळे नियम आहेत?

Gouri said...

त्यांना वेगळे नियम, सौरभ!

Kavs said...

:( mommy guilt la ankhi wadhwa! Me sadhya break var ahe - 2 mahinyat job sure hoil - almost 3 varshani. Majhya aai babani sarkha mala sangitla, career sudhdha mahatvachi ahe, aai tar tu ahesach.

Gouri said...

Kavs, खरंय ग ... आई असण्यापलिकडे स्वतःचं असणंही महत्त्वाचंच ना! बहुतेक वेळा आई घराबाहेर पडातांना आधीच अपराधीपणाचं गाठोडं घेऊन असते. त्यात यांची भर!