Wednesday, April 8, 2009

एका शब्दाचा प्रवास

एका भाषेतले शब्द इतके बेमालूमपणे दुसऱ्या भाषेत मिळून जातात, की आपल्याला याचं मूळ कुठलं अशी शंकासुद्धा येणार नाही.

श्रीलंकन एअरलाईन्समध्ये ‘serendip’ नावाचं पुस्तक बघितलं. काय अर्थ असावा बरं ‘सेरेन्डिप’चा? ’सेरेंडिपिटी’चा या ’सेरेन्डिप’शी काही संबंध? उत्सुकता चळावली गेली. थोडंसं गुगलल्यावर काही गमतीशीर माहिती हाताला लागली.

Serendipity म्हणजे काय माहित आहे? सेरेंडिपिटी म्हणजे अपघाताने आणि उत्तम निरीक्षणशक्तीमुळे वेगळीच मौल्यवान गोष्ट सापडणे - विशेषतः दुसरंच काहीतरी शोधत असतांना. (विकिपेडियाच्या मते हा इंग्रजी भाषेतल्या भाषांतराला कठीण अशा पहिल्या दहा शब्दातला एक शब्द आहे.) हे तर माझ्या बाबतीत नेहेमीच होत असतं - चष्मा शोधताना डोळ्याच्या औषधाची बाटली सापडते. गाडीची किल्ली शोधताना आठवडाभरापासून गायब असणारी लाडकी पेन्सील सापडते. अपघाताने सापडणं - उत्तम निरीक्षणशक्ती असल्यामुळे सापडणं - आणि मौल्यवान गोष्ट सापडणं - हे तीनही निकष पूर्ण होतात की या सगळ्या शोधांमध्ये!!! ;) त्यामुळे आपल्या रोजच्या अनुभवाला चपखल बसणारा हा शब्द मला ‘सेरेंडिपिटी’ने सापडला म्हणून मी खूश होते.

आणि हो - हा शब्द ‘सेरेन्डिप’वरूनच आलेला आहे. हा एक फिरत फिरत इंग्रजीमध्ये पोहोचलेला शब्द आहे. ‘सेरेन्डिप‘चे तीन राजपुत्र’ नावाच्या पर्शियन टाईमपास परिकथेमध्ये त्या राजपुत्रांना अपघाताने + त्यांच्या तेज दृष्टीमुळे असे शोध लागत असतात, त्यावरून.

आणि सेरेन्डिप म्हणजे श्री लंका. सेरेन्डिप हे अरबांनी दिलेलं नाव - अपल्या संस्कृतमधल्या ’सिंहलद्वीप’ वरून आलेलं!!! म्हणजे आता ‘सेरेंडिपिटी’ला सरळ ‘सिंहलद्वीपीय न्याय’ म्हणायला हवं. ;)

8 comments:

Raj said...

वा! शब्दाचा प्रवास आवडला. ब्लॉग रोचक आहे, आवडला.

आळश्यांचा राजा said...

मस्तच आहे!

भानस said...

हा शब्द एकला होता पण अर्थ आणि जन्म माहीत नव्हता.
धन्यवाद.

Anonymous said...

"शब्दबंध"मध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्यास कृपया shabdabandha@gmail.com येथे आपला ईमेल पाठवा.
केवळ श्रवणासाठी सहभागी होता येईल का, याबद्दल अत्तापासून काही सांगता येणार नाही. शक्यतो तसा प्रयत्न करू. सहभागी सदस्यांची संख्या, सत्रांच्या संख्या व वेळा यांवर ते अवलंबून असेल. तुम्ही कृपया आधी गुगलग्रुप मध्ये प्रवेश करा. पुढल्या महिन्यात सत्रांच्या संख्येबद्दल व वेळांबद्दल निश्चिती होईल.

सर्किट said...

सही. तुमच्या चाणाक्ष निरीक्षणशक्ती मुळे, पण अपघातानेच तुम्हाला सेरेण्डिपिटी हा शब्द, आणि त्याचा उगम सापडला! याला म्हणतात ’सेल्फ़ फ़ुलफ़िलिंग थिअरी’.. की ’आयर्नी’? की ’ऑक्झिमोरॉन’? :)

HAREKRISHNAJI said...

आपण महिन्याला एकच पोष्ट लिहीता काय ?

Gouri said...

@ राज, भानस, सर्किट, आळश्यांचा राजा - :)
सर्किट, सेरेंडिपिटीचा अर्थ सेरेंडिपिटीने सापडणं ही एक आयरनी ... :D

हरेकृष्णजी, महिन्याला एका पोस्टचा रतीब असं काही ठरवलं नाहीये हो, पण काही सुचणं, ते टायपायला वेळ मिळणं, मनासारखं उतरणं हे सगळं होईपर्यंत एक महिना उलटून जातो!

Ajay Bhagwat said...

शब्दार्थाची ही एक छोटीशी गोष्ट वाचून मजा आली.